शिर्डी प्रतिनिधी
नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी शिर्डी गाठली. या कालावधीत साईबाबांच्या दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचा प्रत्यय देणारे आकडे साई संस्थानने जाहीर केले असून, अवघ्या आठ दिवसांत साई चरणी तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये इतके विक्रमी दान जमा झाले आहे.

गेल्या आठ दिवसांत आठ लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या कालावधीत रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, सोने-चांदी तसेच परकीय चलनाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर दान प्राप्त झाले आहे.
संस्थानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देणगी काऊंटरवरून 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये जमा झाले. तर पीआरओ सशुल्क देणगी पासेसद्वारे 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. साईबाबांच्या दक्षिणा पेटीतून 6 कोटी 2 लाख 61 हजार 6 रुपये मिळाले असून, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, धनादेश, डिमांड ड्राफ्ट व मनीऑर्डरच्या माध्यमातून 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा झाले आहेत.
रोख रकमेबरोबरच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर मौल्यवान धातूंचीही देणगी दिली आहे. त्यामध्ये 293.910 ग्रॅम सोने, ज्याची अंदाजे किंमत 36 लाख 38 हजार 610 रुपये आहे, तसेच 5,983.970 ग्रॅम चांदी, सुमारे 9 लाख 49 हजार 741 रुपये किमतीची आहे. याशिवाय 26 देशांच्या परकीय चलनातून 16 लाख 83 हजार 673 रुपये प्राप्त झाले आहेत. भाविकांकडून अर्पण करण्यात आलेला सुवर्णजडित हिरे मुकुट सुमारे 80 लाख रुपये किमतीचा असल्याची माहिती संस्थानने दिली.
या दानाची मोजणी करतानाचे छायाचित्रे सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नोटा मोजण्यासाठी टोपल्या, बादल्या आणि बास्केटचा वापर करावा लागल्याचे चित्र त्यातून समोर आले आहे.
नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांच्या कालावधीत साई चरणी झालेल्या या विक्रमी दानामुळे संस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. या संपूर्ण देणगीची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना दिली.


