खोपोली प्रतिनिधी
खोपोली येथे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोठी कारवाई करत नऊ संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर, त्यांची पत्नी उर्मिला देवकर, दोन्ही मुले दर्शन व धनेश देवकर, मेव्हणा तसेच अन्य चार जणांचा समावेश असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या सर्वांना खालापूर न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेने रायगड जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक असलेल्या मंगेश काळोखे यांच्यावर खोपोलीतील विहार जया बार चौकात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. कोयता, तलवार व कुऱ्हाडीने तब्बल २७ वार करण्यात आल्याने काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना खोपोलीत वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. मोठ्या प्रमाणावर जमाव जमला असताना, पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन देत जमावाला शांत केले. याप्रकरणी मयताचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीत निवडणूक वादातून ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला असून, पराभवाचा राग मनात धरून कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे. फिर्यादीत रवींद्र देवकर, त्यांची पत्नी, दोन्ही मुले, मेव्हणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, देवकर यांचा बाऊन्सर आणि अन्य तिघांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विशेष पथके स्थापन करण्यात आली. आरोपींनी मोबाईल फोन बंद ठेवून मुंबई व अन्य ठिकाणी पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवत रविंद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे आणि दिलीप पवार या नऊ जणांना अटक केली.
या सर्वांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात खोपोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत हे अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


