खोपोली/रायगड : प्रतिनिधी
खोपोली शहराला हादरवून सोडलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा अवघ्या २६ तासांत छडा लावत रायगड पोलिसांनी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर यांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या व्यापक तपास मोहिमेमुळे या अटकेला यश आले आहे.
मंगेश काळोखे यांची शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण खोपोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
आठ पथके, विविध ठिकाणी शोधमोहीम
या प्रकरणाच्या तपासासाठी रायगड पोलिसांनी आठ स्वतंत्र पथकांची स्थापना केली होती. ही पथके खोपोली, नवी मुंबई, मुंबई विमानतळ, रायगड जिल्ह्यातील विविध भागांत तसेच अन्य संभाव्य ठिकाणी आरोपींचा शोध घेत होती. अखेर शनिवारी सकाळी नागोठणे परिसरात पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या वाहनाला अडवले आणि रवींद्र देवकर व त्यांचा मुलगा दर्शन यांना ताब्यात घेतले.
नगरपालिका निवडणुकीतील पराभवातून वाढले वैर?
या हत्येच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगरपालिकेतील जुने राजकीय वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेविका असून त्यांनी यापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देवकर कुटुंबातील महिला उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीतील पराभवामुळे दोन्ही गटांमध्ये तीव्र वैमनस्य निर्माण झाले होते, अशी माहिती पुढे येत आहे.
ठिय्या आंदोलनाची तयारी, अटकेनंतर आंदोलन थांबणार?
आरोपींना अटक न झाल्याने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांकडून खोपोलीत ठिय्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. काल दिवसभर काळोखे समर्थकांनी खोपोली पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. मात्र आता मुख्य आरोपींना अटक झाल्याने हे आंदोलन मागे घेतले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके काय घडले होते?
शुक्रवारी सकाळी मंगेश काळोखे हे घराबाहेर पडत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आले होते आणि हल्ल्यानंतर ते तात्काळ फरार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचाही त्यात समावेश आहे. तपास पुढील टप्प्यात नेण्यात येत असून, या हत्येमागील कट, सहभाग आणि संभाव्य राजकीय दबावाचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.


