वाशीम प्रतिनिधी
“विझलो जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही…” मनसेच्या कट्टर कार्यकर्त्याने लिहिलेल्या या भावनिक शब्दांना अजून अर्थ उमजतही नव्हता, तोच दुसऱ्याच दिवशी काळाने निर्दयी झडप घातली. कारंजा नगरपालिकेच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव; मनातल्या वेदना शब्दांत मांडणारा, समर्थपणे उभे राहण्याचा संदेश देणारा हरिश हेडा, भीषण अपघातात कायमचा निघून गेला. कारंज्यात दुःखाचा आणि अविश्वासाचा सिलसिला सुरूच आहे.
बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजता कारंजा–वाशीम बायपासवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. मुलीला शिकवणी वर्गातून घरी सोडून काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या हरिश हेडा यांच्या दुचाकीला भरधाव पिक-अप वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, हेडा यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मनसे कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
कारंजा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पत्नी अलका हेडा मैदानात होत्या. निकालात पराभव झाला; पण राजकारणातील या फटक्यानंतरही हरिश हेडा खचले नाहीत. त्यांनी मंगळवारी सोशल मीडियावर मतदारांचे आभार मानत “लढा इथेच थांबणार नाही” अशी सकारात्मक भूमिका मांडली. हीच पोस्ट आता त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली, हीच वेदनादायी खंत शहराला चटका लावून जाते.
राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन २००८ पासून हरिश हेडा मनसेशी एकनिष्ठ राहिले. पक्षाच्या पडत्या काळातही कारंज्यात मनसेचा झेंडा खांद्यावर वाहत ते पुढे उभे राहिले. प्रामाणिकपणा, जिद्द आणि संघटनेशी निष्ठा ही त्यांची ओळख. या निष्ठावान कार्यकर्त्याच्या अचानक जाण्याने मनसे परिवार हळहळला आहे; कारंजा शहर शोकाकुल झाले आहे.


