चित्रदुर्ग :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियूर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात गोकर्णकडे जाणाऱ्या खासगी बसला लागलेल्या आगीत 17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर हिरियूर आणि चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
VIDEO | Chitradurga, Karnataka: Over 10 people are feared dead in a lorry-bus collision on National Highway 48 near Gorlathu village in Hiriyur taluk.
The bus, travelling from Bengaluru to Shivamogga, caught fire following the crash. Nine passengers reportedly escaped unhurt,… pic.twitter.com/dj75qIiIws
— Press Trust of India (@PTI_News) December 25, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूहून गोकर्णकडे निघालेल्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीने जोरदार धडक दिली. लॉरीने अचानक दुभाजक ओलांडत दुसऱ्या लेनमध्ये घुसल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केले. धडक झाल्यानंतर काही क्षणांतच बसला आग लागली आणि वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.
अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी झोपेत असल्याने त्यांना सुटकेची संधी मिळाली नाही. नऊ प्रवाशांनी मात्र वेळेत बाहेर पडत जीव वाचवला. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिसांनी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर बसचे अवशेष आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या अपघातात काही जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताचे कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


