वर्धा प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पोलीस अधीक्षकपदावर कार्यरत असलेल्या अनुराग जैन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची नागपूर येथील नागरी हक्क संरक्षण दलाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी सौरव कुमार अग्रवाल यांची वर्ध्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच बेकायदेशीर आणि अनैतिक कारवायांना प्रतिबंध घालण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांवर असते. मात्र वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) परिसरात उघडकीस आलेल्या मोठ्या अमली पदार्थ प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आमदार सुमित वानखेडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या मतदारसंघातील कारंजा गावात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छापा टाकून मेफेड्रॉन (एमडी) या कृत्रिम अमली पदार्थाचा मोठा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईत सुमारे १९२ कोटी रुपये किमतीचे १२८ किलो मेफेड्रॉन तसेच २४५ किलो कच्चे रसायन आणि अन्य यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.
इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारा अमली पदार्थांचा उद्योग स्थानिक पोलीस यंत्रणांच्या निदर्शनास कसा आला नाही, असा थेट सवाल विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर कारंजा घाडगे येथील पोलीस ठाणेदारांना तातडीने वर्धा मुख्यालयी जोडण्यात आले, तर काही कर्मचाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील जबाबदारी नेमकी कुणाची, याबाबत चर्चा सुरूच होती.
दरम्यान, प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवळी दौऱ्यावर असताना त्यांनी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्याशी एकांतात चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाल्याने या निर्णयाकडे या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
अनुराग जैन यांनी आपल्या अल्प कार्यकाळात गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. गुन्हेगारांवर जरब बसवतानाच संवादाच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यावर त्यांनी भर दिला होता. ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही ओळखले जातात.
नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झालेले सौरव कुमार अग्रवाल हे सध्या पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत होते. वर्धा जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण बदलाकडे प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.


