नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्लीतील भाजपच्या एका नगरसेविकेने आफ्रिकन नागरिकाला हिंदी शिकण्याचा इशारा दिल्याचा प्रकार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पटपरगंज विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १९७च्या नगरसेविका रेणू चौधरी यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून भाषा, परदेशी नागरिकांचे हक्क आणि सार्वजनिक जागांच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
'एका महिन्यात हिंदी भाषा शिका नाही तर याच्याकडून पार्क काढून घ्या' अस आफ्रिकन फुटबॉल कोचला बोलणाऱ्या या दिल्लीतील भाजप नगरसेविका रेणू चौधरी आहेत !
हेच जर महाराष्ट्रात मराठी बोलण्याबाबत कोणी बोलल असत तर ?@TV9Marathi #renuchaudhary #Maharashtra #Marathi #Delhi pic.twitter.com/oFZbrjrdZ5
— Pramod Jagtap (@PramodSJagtap) December 23, 2025
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रेणू चौधरी एका सार्वजनिक उद्यानात फुटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या आफ्रिकन प्रशिक्षकाला थेट सवाल करताना दिसतात. “तू अजून हिंदी का शिकला नाहीस? एका महिन्याच्या आत हिंदी शिकली नाहीस, तर या उद्यानात येण्याची परवानगी दिली जाणार नाही,” असे त्या सांगताना दिसतात. यावेळी उपस्थित काही नागरिक हा प्रसंग विनोद म्हणून घेत हसताना दिसतात. मात्र, नगरसेविका त्यांना थांबवत, “ही हसण्याची बाब नाही. मी पूर्णपणे गंभीर आहे. आठ महिन्यांपूर्वीच याबाबत इशारा दिला होता,” असे स्पष्ट करतात.
संबंधित परदेशी नागरिक गेल्या सुमारे १५ वर्षांपासून भारतात वास्तव्यास असून, तो मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती आहे. “जर तुम्ही या देशात राहत असाल आणि इथे पैसे कमवत असाल, तर येथील भाषा येणं आवश्यक आहे,” असेही नगरसेविका व्हिडिओत म्हणताना ऐकू येतात.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या प्रकारावर आक्षेप घेत तो धमकीवजा असल्याचे म्हटले, तर काहींनी भाषेच्या सक्तीवर प्रश्न उपस्थित केले.
या पार्श्वभूमीवर रेणू चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आपला हेतू कोणालाही धमकावण्याचा नव्हता. “उद्यानाची देखभाल करणारे महापालिकेचे (एमसीडी) कर्मचारी इंग्रजी समजत नसल्यामुळे प्रशिक्षकाशी संवाद साधताना अडचणी येत होत्या. त्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी मी हे बोलले,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, संबंधित प्रशिक्षक सार्वजनिक उद्यानात शुल्क घेऊन फुटबॉल प्रशिक्षण देत होता आणि आठ महिन्यांपूर्वीच त्याला महापालिकेला महसूल देण्याबाबत सांगण्यात आले होते, असा दावाही त्यांनी केला. “भाषा समजत नसल्याचे कारण देत त्याने याकडे दुर्लक्ष केले. मी त्याला मूलभूत हिंदी शिकवण्यासाठी शिक्षक नेमून देण्याची ऑफरही दिली होती,” असे चौधरी म्हणाल्या.
“हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही,” असे सांगत त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले. “आपल्या देशात बहुसंख्य लोक हिंदी बोलतात. त्यामुळे इथे राहणाऱ्या परदेशी नागरिकांनी हिंदी शिकणे गैर ठरू शकत नाही,” असे त्या म्हणाल्या.
या घटनेमुळे भाषा-सक्ती, परदेशी नागरिकांचे अधिकार आणि सार्वजनिक जागांवरील नियम यावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, समाजमाध्यमांवर मतमतांतरे ठळकपणे व्यक्त होत आहेत.


