नवी दिल्ली :
देशातील नागरिकांची ओळख, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि सुविधांचे मोजमाप करणारी भारताची ऐतिहासिक जनगणना प्रक्रिया यंदा नवा अध्याय सुरू करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२७ मध्ये जनगणना हाती घेण्यास मंजुरी देताच, देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय मोहिमेची तयारी वेग घेऊ लागली आहे. २०२१ मध्ये नियोजित असलेली जनगणना कोविड-१९ साथीमुळे सहा वर्षांनी पुढे ढकलली गेल्यानंतर प्रथमच २०२७ मध्ये पूर्णपणे डिजिटल जनगणना होणार आहे.
दोन टप्प्यांत होणार सर्वेक्षण
भारताची जनगणना रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त (RGI) यांच्या देखरेखीखाली पार पडते. पारंपरिक पद्धतीप्रमाणेच २०२७ मध्येही ही प्रक्रिया दोन टप्प्यांत केली जाईल
टप्पा १ : घरांची यादी व गृहनिर्माण गणना
२०२६ मध्ये याची सुरुवात होणार असून घरांची माहिती, सुविधा, बांधकामप्रकार याची डिजिटल नोंद केली जाईल. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान देशभरात घरांची यादी तयार केली जाईल.
टप्पा २ : प्रत्यक्ष लोकसंख्या गणना
१ मार्च २०२७ पासून हा टप्पा सुरू होईल. गणक कर्मचारी घरोघरी भेट देऊन व्यक्तींची माहिती डिजिटल टॅब्लेट किंवा मोबाइल अॅपवर नोंदवतील. फेब्रुवारी, मार्चच्या थंड हवामानात देशभर एकाच कालावधीत गणना करण्याची जुनी परंपरा कायम ठेवली जाणार आहे.
पहिल्यांदाच ‘स्व-गणना’
या वेळी नागरिकांना स्वतःच ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरता येणार आहे. ‘सेल्फ एन्युमरेशन’मुळे प्रक्रिया अधिक पेपरलेस, जलद आणि पारदर्शक होणार आहे. ग्रामीण ते शहरी भागात घरांचे अचूक डिजिटल मॅपिंग करण्यासाठी जीपीएस, ट्रॅकिंगचा वापरही होणार आहे.
जातींची गणना १९३१ नंतर प्रथमच
२०२७ मध्ये एक मोठा बदल म्हणजे जातीसंबंधित माहिती अधिकृत रीत्या गोळा केली जाणार आहे. स्वतंत्र भारतात प्रथमच हा डेटा सर्वांगीण स्वरूपात उपलब्ध होणार आहे. सामाजिक धोरणे, अनुदान योजना आणि संसाधनांचे वितरण यासाठी हा आकडा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
कामगारांचे प्रशिक्षण, दुर्गम भागांची धावपळ कायम
गणनेसाठी शालेय शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक गणकाला सुमारे १००–१५० घरांची जबाबदारी असेल. बंद घरे, स्थलांतरित कामगार, दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहचणे हे नेहमीचेच आव्हान यावेळीही दिसणार आहे.
कोणती माहिती गोळा केली जाणार?
• लोकसंख्या व वैयक्तिक माहिती : नाव, वय, लिंग, वैवाहिक स्थिती, जन्म-मृत्यू
• सामाजिक माहिती : धर्म, भाषा, जात/जमात, साक्षरता
• आर्थिक माहिती : व्यवसाय, रोजगार, उत्पन्नाचे स्रोत, स्थलांतर
• घरगुती सुविधा : घराचा प्रकार, पाणी, वीज, शौचालय, इंटरनेट, स्वयंपाक इंधन
• इतर आकडे : प्रजननदर, मृत्युदर, डिजिटल मालमत्ता
• २०११ ची जनगणना पेपरवर; २०२७ पूर्ण डिजिटल
२०११ मधील शेवटच्या जनगणनेत २.७ दशलक्ष कर्मचारी सहभागी झाले होते. पूर्णपणे कागदावर आधारित या मोहिमेत १२१ कोटी लोकसंख्येची नोंद झाली होती. तीन वर्षांच्या प्रक्रियेनंतर अंतिम अहवाल जाहीर झाला. २०२७ मध्ये तीच प्रक्रिया अधिक तंत्रज्ञानाधिष्ठित, वेगवान आणि कागदरहित होणार आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा
२०२७ च्या जनगणनेतून मिळालेला आकडेवारीचा खजिना भविष्यात लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर प्रभाव टाकू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ही जनगणना केवळ सांख्यिकीय नसून अनेक पातळ्यांवर निर्णायक ठरणार आहे.


