नवी दिल्ली/झाशी:
करचोरीच्या गंभीर प्रकरणात दिलासा देण्यासाठी दीड कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत २०१६ बॅचच्या भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी प्रभा भंडारी यांना अटक केली आहे. झाशी येथे तैनात असलेल्या भंडारी यांना ७० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्यांच्या सहकाऱ्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर, दिल्लीहून अटक करण्यात आली.
या प्रकरणात दोन जीएसटी अधीक्षक, एक वकील आणि अन्य दोन जणांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नेमके प्रकरण काय?
सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी प्रभा भंडारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने झाशीतील ‘जय दुर्गा हार्डवेअर’ या व्यावसायिक आस्थापनेवर छापा टाकला होता. या कारवाईत संबंधित फर्मवर सुमारे १३ कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. छाप्यात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
ही कारवाई मागे घेण्यासाठी आणि प्रकरण ‘सेटल’ करण्यासाठी व्यावसायिकाकडे दीड कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारात वकील नरेश कुमार गुप्ता मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
CBIचा सापळा आणि अटक
लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने सापळा रचला. ७० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना जीएसटी अधीक्षक अनिल कुमार तिवारी आणि अजय कुमार शर्मा यांना रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी या लाचखोरीमागे प्रभा भंडारी असल्याचे सांगितले.
तपासादरम्यान सीबीआयने एक फोन संभाषण रेकॉर्ड केल्याचा दावा केला आहे. या संभाषणात भंडारी यांनी लाचेची रक्कम सोन्यात रूपांतरित करून आपल्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिल्याचे समोर आले आहे. या पुराव्याच्या आधारे सीबीआयने दिल्लीहून त्यांना अटक केली.
झाशीतील निवासस्थानावर छापेमारी
अटकेनंतर सीबीआयने प्रभा भंडारी यांच्या झाशी येथील शासकीय निवासस्थानावर सुमारे चार तास झडती घेतली. या कारवाईत रोख रक्कम, दागिने तसेच मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. भंडारी या गेल्या सहा महिन्यांपासून झाशीत कार्यरत होत्या. तपासात त्यांनी काही महिन्यांपूर्वी सुमारे ६८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याची माहितीही समोर आली आहे.
न्यायालयीन कोठडी
३० डिसेंबर रोजी सीबीआयने प्रभा भंडारी यांच्यासह सात जणांविरोधात औपचारिक गुन्हा दाखल केला. भंडारी आणि दोन्ही अधीक्षकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
एका वरिष्ठ महिला आयआरएस अधिकाऱ्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाकडे केंद्र सरकारसह वरिष्ठ पातळीवर लक्ष ठेवले जात आहे.


