सिंदखेड राजा प्रतिनिधी
सिंदखेड राजाच्या राजकारणात नव्या पिढीचा ठसा उमटवत अवघ्या २१व्या वर्षी सौरभ विजय तायडे यांनी नगराध्यक्षपद पटकावले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सौरभ तायडे यांनी १५८ मतांनी विजय मिळवत नगरपरिषदेची सूत्रे हाती घेतली असून, हा निकाल ‘युवाशक्तीचा स्पष्ट कौल’ मानला जात आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली होती. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चुरस कायम होती. अखेर निकाल जाहीर होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण सिंदखेड राजा दुमदुमून गेला.
सर्वात तरुण नगराध्यक्ष
निकालाच्या दिवशी सौरभ तायडे यांचे वय २१ वर्षे १० महिने २८ दिवस इतके होते. त्यामुळे ते सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या इतिहासातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरले आहेत. एम.एस्सी. आणि बी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या सौरभ तायडे यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण सिंदखेड राजातच झाले आहे. आई-वडील आणि दोन बहिणी असे त्यांचे कुटुंब असून, सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा त्यांना लाभला आहे.
त्यांच्या आजी रुक्मिणीबाई राधाजी तायडे यांनी यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, तर वडील विजय तायडे हे प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यामुळे तायडे कुटुंबीयांचे शहरातील सामाजिक जीवनात सक्रिय योगदान राहिले आहे.
युवकांची निर्णायक भूमिका
या निवडणुकीत शहरातील युवकांची भूमिका निर्णायक ठरली. प्रचार रॅल्या, घरोघरी संपर्क, तसेच सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून युवकांनी सौरभ तायडे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. निवडणूक काळात युवकांचा उत्साह आणि संघटनशक्ती ठळकपणे दिसून आली.
प्रचारादरम्यान सौरभ तायडे यांनी विकास, पारदर्शक कारभार, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण तसेच युवकांसाठी रोजगार व संधी निर्माण यांवर विशेष भर दिला होता. तसेच मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.
‘हा विजय सर्वसामान्यांचा’
विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे म्हणाले, “हा विजय माझा वैयक्तिक नसून सिंदखेड राजातील सर्वसामान्य नागरिक, युवक आणि माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे. मिळालेल्या संधीचे सोने करत सर्वांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन.”
या निकालामुळे सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या राजकारणात नव्या पिढीचे नेतृत्व पुढे आले आहे. अत्यंत तरुण वयात जबाबदारी स्वीकारलेल्या सौरभ तायडे यांच्या कार्यकाळाकडे आता शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


