सातारा प्रतिनिधी
सातारा : पवनचक्कीमधील तांब्याच्या केबल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी चार जणांच्या टोळीला जेरबंद करून पाच गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आरोपींकडून सुमारे १८ लाख ८० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सडावाघापुर व सडादाडोली परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधून तांब्याच्या केबल वायर चोरी झाल्याच्या तक्रारी ८ फेब्रुवारी ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत पाटण पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार गुन्हे नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी विशेष पथकाची स्थापना केली. गोपनीय माहितीच्या आधारे चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सारीश संजय सावळवाडे (रा. आगाशिव नगर, कराड), दत्तात्रय जगन्नाथ झोरे (रा. सडावाघापुर, पाटण), निलेश श्रीमंत सूर्यवंशी (रा. पाबळवाडी, पाटण) आणि प्रमोद सरेश निकम (रा. मसूर, कराड) यांचा समावेश आहे.
या आरोपींकडून पाटण, सातारा तालुका व उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. कारवाईदरम्यान १७ लाख ७६ हजार १४ रुपये किमतीच्या केबल वायर व मशीनसह एक लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि वजनकाटा जप्त करण्यात आला आहे.
आरोपींना १५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत सहभागी झालेल्या गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.


