ठाणे प्रतिनिधी
कल्याण फाटा परिसरात सुरू असलेल्या महानगर गॅसच्या कामादरम्यान ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एका महत्त्वाच्या जलवाहिनीला मोठे नुकसान झाल्याने, ठाणेकरांना पुढील काही दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या घटनेमुळे ठाणे शहरात १९ डिसेंबर २०२५ पर्यंत तब्बल ५० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसे बंधारा ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेणारी १,००० मिमी व्यासाची मुख्य पाण्याची पाइपलाईन ११ डिसेंबर रोजी चार ते पाच ठिकाणी फुटली. ही पाइपलाईन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीटची असून ती जुनी असल्याने दुरुस्तीचे काम अधिक किचकट ठरत आहे. सध्या दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून, हे काम पूर्ण होण्यासाठी किमान चार दिवस लागण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठ्यात मोठी घट झाल्याने शहरातील सर्व भागांत समन्यायी वितरणासाठी विभागीय पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याअंतर्गत दिवसाला सुमारे १२ तास पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे अनेक भागांत नागरिकांना मर्यादित प्रमाणात व अनियमित वेळेत पाणी मिळण्याची शक्यता आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याबाबत आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. सुमारे २५० कोटी रुपयांच्या थकीत पाणीबिलांची वसुली करण्यासाठी महापालिकेने व्यापक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ९२.२८ कोटी रुपये प्रलंबित थकबाकीची असून १५७.८ कोटी रुपये चालू आर्थिक वर्षातील थकबाकी आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी चालू आर्थिक वर्षात १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.
एप्रिलपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत सुमारे ४३ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून ही रक्कम एकूण थकबाकीच्या सुमारे १८ टक्के आहे. वसुलीचा भाग म्हणून थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन तोडणे, मोटार पंप जप्त करणे तसेच मीटर रूम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. थकबाकी न भरता पुन्हा पाणीपुरवठा जोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
एकीकडे पाणीटंचाई, तर दुसरीकडे कडक वसुली कारवाई, या दुहेरी संकटामुळे ठाणेकरांची चिंता आणखी वाढली आहे.


