नवी दिल्ली वृत्तसंस्था
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी अस्वस्थ करणारी घडामोड समोर आली आहे. ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सहा जणांविरोधात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) नवा गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) सूचना मिळाल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
नव्या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत सूमन दुबे, सॅम पित्रोदा तसेच ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’, ‘यंग इंडियन’ आणि ‘डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड’ यांचाही समावेश असल्याची माहिती रविवारी समोर आली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ‘ईडी’ने या आर्थिक गैरव्यवहारचा तपास सुरू केला होता. ‘ईडी’ने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाविरोधात आरोपपत्र आधीच दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
मुख्य आरोप काय?
तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची सुमारे दोन हजार कोटींची मालमत्ता अवैधरीत्या हस्तगत करण्यासाठी संगनमत झाल्याचा ठपका आहे. ‘यंग इंडिया’कडे केवळ ५० लाखांत AJLची मालमत्ता हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. या आरोपांनंतर ‘ईडी’ने ७०० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यानंतरच EOWकडे नवा गुन्हा नोंदवण्यात आला.
काँग्रेसचा पलटवार : “राजकीय सूड”
या घडामोडीवर काँग्रेसने केंद्रावर तीव्र निशाणा साधला आहे. तपास यंत्रणांचा “सूडबुद्धीने” गैरवापर होत असल्याचा आरोप करत “नॅशनल हेराल्ड प्रकरण पूर्णपणे बनावट आहे… शेवटी न्यायाचाच विजय होईल. सत्यमेव जयते,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर नोंदवली.
या प्रकरणातील काँग्रेसचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही, “या प्रकरणात कुठलीही आर्थिक देवाण-घेवाण नाही, मालमत्तेचे हस्तांतरण झाले नाही; तरीही तपास यंत्रणांना गैरव्यवहार दिसतोय. नव्या गुन्ह्यात काहीही नवीन नाही,” अशी टीका केली.
हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना या घडामोडींमुळे राजकीय गलियार्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.


