अहिल्यानगर प्रतिनिधी
संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खांडगाव फाटा परिसरात जप्त करण्यात आलेल्या तब्बल एक कोटी रुपयांच्या रोकडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आचारसंहितेच्या काळात इतकी मोठी रक्कम सापडल्याने निवडणूक खर्च व मतदार प्रभावित करण्याच्या शक्यतांवरून चर्चा तापल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाच्या प्राथमिक तपासात या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे.
शनिवारी दुपारी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वेक्षण पथकाने एका कारची तपासणी केली असता ही रोकड आढळली. निवडणूक आयोग व पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रक्कम जप्त केली. दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू असून विविध आघाड्या, प्रचारसभा व राजकीय हालचालींना वेग आला असताना हा प्रकार उघडकीस आला होता.
तपासादरम्यान संबंधित दोन कंपन्यांनी अजमेरा ग्रुप आणि अक्षया कन्स्ट्रक्शन, यांनी आवश्यक कागदपत्रे निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केली. त्या आधारे प्राथमिक पडताळणीत हे स्पष्ट झाले की ही रक्कम धाराशिव येथील एका बँकेतून अधिकृतपणे काढण्यात आली होती. कंपन्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजांत व्यवहाराचा संपूर्ण तपशील असल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आयोग सध्या कागदपत्रांची अंतिम तपासणी करत असून, ही रोकड निवडणुकीशी संबंधित कोणत्याही गैरव्यवहारासाठी नव्हती, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. अंतिम आदेशानंतर रक्कम संबंधित कंपन्यांना परत देण्यात येणार आहे.
तथापि, निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या रकमेत चाळवाचाळवी झाल्याची बातमी समोर आल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.


