
बीड प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर
बीडमधील अनेक बेकायदेशीर कृत्यांची चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात परळीतील वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप आहे.
त्यानंतर परळीतील अनेक बेकायदेशीर कृत्य, व्यवसाय यांच्या अनेक सुरस कथांची चर्चा सुरू झाली आहे. विद्युत केंद्रातील राखेचीही चर्चा सुरू झाली आहे. अशातच परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या डंपर ने दिलेल्या धडकेत एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे.
परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे. या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते. या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.