सातारा प्रतिनिधी
फलटण शहरातील अत्यंत संवेदनशील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिसांनी माध्यमांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. फलटण शहर पोलीस ठाण्यात गु.नं. 345/2025, भारतीय न्याय संहिता कलम 64(2) इत्यादी प्रमाणे 24 ऑक्टोबर 2025 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने आणि प्रशांत किसन बनकर (वय 29, रा. फलटण) यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात एक महिलेला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी माध्यमांना आवाहन केले आहे की, गुन्ह्यातील पिडीत महिलेची ओळख, नाव, पत्ता किंवा ओळख पटेल अशी कोणतीही माहिती बातम्यांमध्ये प्रकाशित किंवा प्रसारित होऊ नये. या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन बातमी देताना अत्यंत जबाबदारीने वागावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तपास प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने तथ्यहीन, दिशाभूल करणारी किंवा तपासात अडथळा आणणारी माहिती प्रसारित करणे टाळावे, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच पिडीत महिला अथवा गुन्ह्यातील संबंधित व्यक्तींचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य किंवा संशय निर्माण करणारी मांडणी कोणत्याही माध्यमातून होऊ नये, ही प्रत्येक पत्रकार आणि संपादकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नमूद केले आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये माहिती, दृश्ये वा बातम्या कायद्याच्या मर्यादेत राहूनच प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अन्यथा, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 72 (माजी आयपीसी 228A), भारतीय राज्यघटनेचे कलम 21 आणि डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 मधील तरतुदींचे उल्लंघन ठरून, संबंधितांवर गुन्हेगारी कारवाई होऊ शकते, अशीही स्पष्ट चेतावणी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांच्या या सूचनांमुळे माध्यमांनी खबरदारीचे बाळगलेले पाऊल आणि जबाबदार वृत्तांकनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.


