सातारा प्रतिनिधी
सातारा पोलीस दलातील हवालदार प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय ५१, रा. तांबवे, ता. कराड) यांचा मुंबईतील भांडुप परिसरात रविवारी आयोजित सत्संग कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सहकुटुंब आनंदाने नृत्य करत असतानाच आलेला हा झटका सर्वांना हादरवून गेला.
काटवटे हे सातारा जिल्हा पोलीस दलातील परिपूर्ण कर्तव्यनिष्ठ आणि उत्साही अधिकारी म्हणून ओळखले जात. १९९७ साली त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश केला होता. गेली सात वर्षे ते कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
सत्संग कार्यक्रमासाठी त्यांनी काही दिवसांची रजा घेतली होती. रविवारी कुटुंबासह ते मुंबईला गेले आणि कार्यक्रमात पूर्ण मनोभावे सहभागी झाले. कुटुंबासह धार्मिक गाण्यांवर त्यांनी नृत्याचा आनंद लुटला. या क्षणांचा व्हिडिओही त्यांच्या जवळच्यांनी टिपला. मात्र काही क्षणांतच त्यांना अस्वस्थता जाणवली. उपस्थितांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
आज सकाळी मुंबईतील शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पार्थिव तांबवे (ता. कराड) येथे आणण्यात येणार आहे. सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या निधनाने कराड पोलीस ठाण्यासह संपूर्ण जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली आहे. उत्कृष्ट खेळाडू, कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि प्रेमळ कुटुंबवत्सल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटवटे यांच्या जाण्याने अनेक सहकाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि भाऊ असा परिवार आहे.


