सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी या छोट्याशा खेड्यात जन्मलेली ‘राधा’ म्हैस आता थेट जगाच्या नकाशावर पोहोचली आहे. जगातील सर्वांत बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून ‘राधा’ची अधिकृत नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या ठेंगण्या ‘राधा’ने आता महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील पशुपालकांचा अभिमान वाढवला आहे.
शेतकरी त्रिंबक बोराटे यांच्या मुऱ्हा म्हशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी जन्मलेली ‘राधा’ सुरुवातीला अगदी सामान्य होती. मात्र दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील फरक स्पष्ट दिसू लागला. हे लक्षात आल्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेतने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला.
२१ डिसेंबर २०२४ रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात ‘राधा’चा पहिला सहभाग झाला आणि तिथूनच तिचा प्रवास देशभर सुरू झाला. त्यानंतर पुसेगाव, निपाणी (कर्नाटक) आणि परभणीसह तब्बल १३ कृषी प्रदर्शनांत ‘राधा’ने आपली उपस्थिती लावली. प्रत्येक ठिकाणी ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
२४ जानेवारी २०२५ रोजी ‘राधा’ची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली, तर अखेर २८ ऑक्टोबर २०२५ रोजी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिला “जगातील सर्वांत बुटकी जिवंत पाळीव म्हैस” म्हणून अधिकृत मान्यता दिली. या यशामागे पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे अनिकेत बोराटे यांनी सांगितले.
“आमची ‘राधा’ प्रत्येक कृषी प्रदर्शनात लक्ष वेधून घेते. सामान्य शेतकरी, मान्यवर, तज्ज्ञ, सगळ्यांनाच ती आकर्षून ठेवते. ‘गिनेस बुक’मध्ये नोंद झाल्याचा आम्हाला अपार अभिमान आहे. आता ‘राधा’ला आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नेण्याचा आमचा प्रयत्न आहे,”
अनिकेत बोराटे, मालक, मलवडी (ता. माण, जि. सातारा)
‘राधा’ची माहिती एका नजरेत :
जन्म : १९ जून २०२२
ठिकाण : मलवडी, ता. माण, जि. सातारा
वजन : २८५ किलो
उंची : ८३.८ सेंमी (२ फूट ८ इंच)
वैशिष्ट्य : जगातील सर्वांत बुटकी जिवंत पाळीव म्हैस
ही “ठेंगणी राधा” आता साताऱ्याच्या मातीचा जागतिक मान साकारत असून, ग्रामीण भागातील पशुपालनातूनही जागतिक कीर्ती कशी मिळवता येते, याचं प्रतीक ठरली आहे.


