सातारा प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने 24 ऑक्टोबरला आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते.
संपदा मुंडे संशयास्पद मृत्यू प्रकरणातील गोपाळ बाळासाहेब बदने याला भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) नुसार ४ नोव्हेंबर २०२५ पासून 'शासकीय सेवेतून बडतर्फ' केलं आहे. PI सुनील महाडिक वर सुद्धा तात्काळ कारवाई झाली पाहिजे.
दोन PA रोहित नागटीळक, राजेंद्र शिंदे, या…
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 5, 2025
त्यामुळे सध्या हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. याच आरोपींपैकी पीएसआय गोपाळ बदने याच्यावर सुरुवातीला पोलीस खात्यातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता गोपाळ बदने याने या प्रकरणात अधिकाराचा गैरफायदा केल्याचे म्हणत त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. असे असले तरी इतरांवर कारवाई कधी? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण सुषमा अंधारे यांनी उचलून धरले आहे. त्या दररोज या प्रकरणात आरोप करताना दिसतात. दोन दिवसांपूर्वीच सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, आता गोपाळ बदने याला बडतर्फ केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भाष्य केले आहे. सुषमा अंधारे यांनी पोस्ट करताना म्हटले की, महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील गोपाळ बाळासाहेब बदने याला भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्छेद 311 (2) (ब) नुसार 4 नोव्हेंबर 2025 पासून ‘शासकीय सेवेतून बडतर्फ’ केलं आहे. परंतु पीआय सुनील महाडिकवर सुद्धा तत्काळ कारवाई झाली पाहिजे. तसेच दोन पीए रोहित नागटीळक आणि राजेंद्र शिंदे हे दोघे ज्या खासदाराकडे पीए होते, तो खासदार आणि डॉ. अंशुमन धुमाळ, तसेच तत्कालीन डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपत्रे आणि पीएसआय पाटील यांचं काय? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांनी नावं घेतलेल्या लोकांवर कारवाई होते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ बदने याच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले होते. मात्र महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात बदनेचा सहभाग असल्याचे उघडकीस झाल्यानंतर त्याचे इतरही काही कारनामे समोर आले. त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही देखील त्रास दिल्याची माहिती आता समोर आली आहे. पीएसआय बदने अनेकदा महिलांची छेड काढायचा आणि त्यांना डोळाही मारायचा, असाही धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे आता विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबतचे पत्रक पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे.


