नवी दिल्ली वृत्तसंस्था
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह कंपन्यांवरील कारवाईचा विळखा अधिक घट्ट होत असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मोठी कारवाई केली. नवी मुंबईतील 132 एकर परिसरात पसरलेल्या धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) कॅम्पसची जप्ती करण्यात आली असून या मालमत्तेची किंमत तब्बल 4,462 कोटी रुपये एवढी आहे.
ईडीच्या सूत्रांनी पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहण्याचे संकेत दिले आहेत.
“ही फक्त सुरुवात आहे. पुढील काळात आणखी जप्ती तसेच अनिल अंबानी आणि रिलायन्स समूहातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर खटला दाखल होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिली.
यापूर्वी एजन्सीने मुंबईतील पाली हिलमध्ये अनिल अंबानी यांच्या समुद्रकिनारी असलेल्या निवासस्थानासह 42 स्थावर मालमत्तांची जप्ती केली होती. यांची एकूण किंमत 4,400 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
कौटुंबिक समझोत्यापासून जप्तीपर्यंत…
2005 मध्ये मुकेश अंबानी व अनिल अंबानी यांच्यातील कौटुंबिक समझोत्याचा भाग म्हणून विशाल डीएकेसी कॅम्पस अनिल अंबानी यांच्या ताब्यात आला होता. रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) या त्यांच्या दूरसंचार कंपनीकडे या कॅम्पसची मालकी होती. आरकॉम दिवाळखोरी प्रक्रियेत गेल्याने त्याची मालकी नंतर उपकंपन्यांकडे स्थानांतरित झाली.
गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या चौकशीने अनिल अंबानी यांच्यावर दबाव वाढवला आहे. बँकांकडून कर्ज मिळवून ते वैयक्तिक आणि इतर कंपन्यांमार्फत वळवल्याच्या आरोपांवर चौकशी सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततेचे आरोप
ईडीच्या चौकशीनुसार 2010 ते 2012 दरम्यान आरकॉम आणि समूह कंपन्यांनी देशांतर्गत व परदेशी बँकांकडून घेतलेल्या 40,185 कोटी रुपयांच्या कर्जात मोठ्या अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच बँकांनी या कर्जांना फसवणूक खात्यांत वर्गीकृत केले आहे.
कर्जाच्या सदाहरितीकरणासाठी 13,600 कोटी रुपये वळवले
संलग्न कंपन्यांना 12,600 कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला
1,800 कोटी रुपये एफडी/म्युच्युअल फंडातून समूह कंपन्यांना परत पाठवले
फॉरन रेमिटन्सद्वारे निधी परदेशात हलवण्याचाही आरोप आहे. याप्रकरणी काही महिन्यांपूर्वीच अनिल अंबानी यांची ईडीने चौकशी केली होती.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून प्रकरण फसवणुकीचे घोषित झाल्यानंतर ईडीने कारवाईचा वेग वाढवला आहे. यापूर्वी येस बँकेचे माजी संचालक राणा कपूर आणि अनिल अंबानी यांच्या संबंधीही प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


