नवी दिल्ली वृत्तसंस्था
वाहनचालकांनो, लक्ष द्या!
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) सर्व वाहन चालकांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सर्व ड्रायव्हिंग लायसन्स धारकांनी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तात्काळ अद्ययावत (अपडेट) करावा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागू शकतात.
कारण, तुमचा मोबाईल क्रमांक जर चुकीचा, बंद किंवा लायसन्सशी लिंक नसलेला असेल, तर शासनाकडून येणारे अत्यावश्यक संदेश, ‘जसे की ई-चलान, वाहतूक नियमभंगाची नोटीस, दंडाच्या सूचना किंवा लायसन्स नूतनीकरणाच्या आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही
• जुना नंबर ठरू शकतो डोकेदुखीचं कारण
मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्व अधिकृत माहिती थेट ड्रायव्हिंग लायसन्सशी संलग्न मोबाईल क्रमांकावरच पाठवली जाते. त्यामुळे जर हा नंबर चुकीचा किंवा निष्क्रिय असेल, तर संपूर्ण प्रणाली (सिस्टीम) तुमच्याशी संपर्क साधू शकत नाही.
काही राज्यांमध्ये तर मोबाईल नंबर अद्ययावत नसल्यास लायसन्स नूतनीकरणात विलंब होतो. आणि काही वेळा माहिती पडताळणी पूर्ण होईपर्यंत लायसन्स निलंबित (Suspend) करण्यात येते.
• Parivahan पोर्टलवर प्रक्रिया सोपी आणि जलद
शासनाने ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी अधिक सोयीस्कर केली आहे. आता तुम्ही काही मिनिटांतच Parivahan पोर्टल (www.parivahan.gov.in) किंवा तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता.
• अपडेट करण्याची प्रक्रिया :
1. www.parivahan.gov.in किंवा आपल्या राज्याच्या RTO वेबसाइटवर लॉगिन करा.
2. ‘Driving Licence Services’ या विभागात ‘Update Mobile Number’ हा पर्याय निवडा.
3. तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक, जन्मतारीख इत्यादी आवश्यक तपशील भरून OTP द्वारे सत्यापन (Verification) करा.
4. अपडेट पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर दिसणारे कन्फर्मेशन (Confirmation) जतन करून ठेवा.
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून, यासाठी RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही.
• ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सूचना
मंत्रालयाने नागरिकांना विशेष विनंती केली आहे की त्यांनी आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्यांचे लायसन्स तपासावे. अनेकदा त्यांचा मोबाईल क्रमांक जुना किंवा निष्क्रिय असतो, ज्यामुळे शासनाकडून येणाऱ्या महत्त्वाच्या नोटिसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
त्यामुळे त्यांच्या वतीने क्रमांक अद्ययावत करून द्या, जेणेकरून दंडात्मक कारवाई किंवा लायसन्स निलंबनाच्या त्रासातून बचाव होईल.
• एक छोटीशी अपडेट, मोठ्या अडचणींपासून सुटका!
वाहन चालवताना नियम पाळणे जितके आवश्यक, तितकेच तुमची कागदपत्रं अद्ययावत ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडलेला मोबाईल नंबर तपासा आणि गरज असल्यास अपडेट करा.
थोडा वेळ आज द्या, उद्याची अडचण टाळा!


