सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
भोपाल : भाजप नेत्या आणि माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या ‘लव्ह जिहाद’विषयी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. “मुलगी पालकांचे ऐकत नसेल, दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी संबंध ठेवत असेल तर तिचे पाय तोडा,” असे वक्तव्य त्यांनी केल्याचे समजते. या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “जेव्हा मुलगी मोठी होते, तेव्हा ती अनेकदा स्वतःचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करते. पण पालकांनी सजग राहून तिची योग्य काळजी घेतली पाहिजे.
‘लव्ह जिहाद’सारख्या गोष्टींपासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी कठोर पावले उचलावी लागली तरी मागे हटू नका.”त्या पुढे म्हणाल्या, “जर मुलगी ऐकण्यास तयार नसेल, तर तिच्या भल्यासाठी कठोर भूमिका घ्या; गरज वाटल्यास तिचे पाय तोडून टाका. तिच्या भविष्यासाठी थोडा कठोरपणा दाखवावा लागला तरी घाबरू नका.”या वक्तव्यावर महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांसह अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी साध्वींच्या वक्तव्याला “कायद्याचा अवमान” आणि “स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा” ठरवले आहे.दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की त्यांनी फक्त पारंपारिक कौटुंबिक मूल्यांचे रक्षण करण्याची भूमिका घेतली आहे. “आजच्या काळात मुलांनी चुकीच्या प्रभावांना बळी न पडता संस्कारांनी वागावे, हेच साध्वी प्रज्ञा सांगू इच्छित होत्या,” असे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.


