
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या सलग भेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या गाठीभेटी युतीच्या चर्चांना नवी उभारी देत आहेत.
गेल्या काही महिन्यांत दोघांमध्ये तब्बल सहा बैठका झाल्या असून, रविवारी सायंकाळी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले. तब्बल पावणेतीन तास चाललेल्या चर्चेत मुंबई महापालिका निवडणुकीवर सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आठवड्याभरात ही त्यांची दुसरी भेट असल्याने युतीच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
“भेटी वाढत आहेत, ही आनंदाची बाब” ‘ बाळा नांदगावकर
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटींवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
“दोघे भाऊ एकत्र येत आहेत, ही बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. अजून युती अधिकृत नाही, पण त्याकडे वाटचाल सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही,” असं ते म्हणाले.
राज ठाकरे : “ही दोन भावांची भेट”
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले,
“माझी आई माझ्यासोबत होती. ही कुटुंबीयांची भेट होती, राजकारणाची नाही.”
तथापि, बीएमसी निवडणुका अगदी दारात असताना झालेल्या या ‘कौटुंबिक’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
युतीच्या दिशेने वाटचाल?
राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२४ च्या निवडणुकीनंतर ठाकरे बंधू आता राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता बीएमसी निवडणुकीत युतीची चर्चा गंभीर स्तरावर पोहोचली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, युतीबाबतची प्राथमिक रूपरेषा ठरली असून अधिकृत घोषणा केवळ औपचारिकता उरली आहे.
दोन्ही ठाकरे बंधूंच्या सहाव्या भेटीनंतर मुंबईच्या राजकारणात नव्या अध्यायाची चाहूल लागली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा “ठाकरे विरुद्ध बाकी सगळे” अशीच लढत रंगणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.