
नवी दिल्ली वृत्तसंस्था
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून आधार कार्डसंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम आधार अपडेट प्रक्रिया, शुल्क तसेच कार्डवर दिसणाऱ्या काही महत्त्वपूर्ण माहितीवर होणार आहे.
१० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट अनिवार्य
ज्यांचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जुने आहे, त्यांनी ते तातडीने अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा बँकिंग, शासकीय योजना, सिम कार्ड यांसारख्या अनेक सेवांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा UIDAI ने दिला आहे.
अपडेटसाठी नव्या शुल्काची अंमलबजावणी
१ ऑक्टोबरपासून नाव, पत्ता यांसारख्या साध्या दुरुस्त्यांसाठी आता ₹७५ शुल्क आकारले जाणार आहे. तर फोटो, बोटांचे ठसे यांसारख्या बायोमेट्रिक माहितीच्या अपडेटसाठी ₹१२५ शुल्क आकारले जाईल. ७ ते १७ वयोगटातील मुलांसाठी देखील बायोमेट्रिक बदलासाठी ₹१२५ शुल्क लागू असेल.
याउलट, ५ ते ७ वर्षे व १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या अनिवार्य
बायोमेट्रिक अपडेटसाठी पूर्वी आकारले जाणारे ₹५० शुल्क रद्द करण्यात आले आहे. या वयोगटातील मुलांनी वेळेत अपडेट न केल्यास त्यांचे आधार कार्ड अमान्य होऊ शकते.
नवीन आधार कार्ड मिळवण्यासाठी मात्र कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही; ती सेवा पूर्वीप्रमाणे मोफतच राहणार आहे.
पती किंवा वडिलांचे नाव नसेल दिसणार
UIDAI ने १५ ऑगस्ट २०२५ पासून आणखी एक महत्त्वपूर्ण बदल लागू केला आहे. आता १८ वर्षांवरील व्यक्तींच्या आधार कार्डवर पती किंवा वडिलांचे नाव छापले जाणार नाही. ही माहिती फक्त UIDAI च्या रेकॉर्डमध्ये नोंदवली जाईल. विशेषतः महिलांसाठी हा बदल गोपनीयतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
जन्मतारखेतही बदल
आधार कार्डवरील जन्मतारीख आता पूर्ण दिनांकाऐवजी केवळ जन्मवर्ष या स्वरूपात दिसणार आहे. संपूर्ण जन्मतारीख UIDAI च्या नोंदीत मात्र कायम राहील. त्यामुळे आधारवर फक्त नाव, वय आणि पत्ता हीच माहिती प्रमुख्याने दिसणार आहे.
UIDAI च्या या नव्या नियमांमुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित, गोपनीयतापूर्ण व अद्ययावत राहील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.