
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकारलेले हे पोलीस ठाणे आता राज्यातील सर्वात सुसज्ज ठाणे असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
जीर्ण आणि कोंदट अशा तीन खोल्यांतून सानपाडा विभागाचा कायदा सुव्यवस्थेचा गाडा हाकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता चार मजली, १८ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक इमारतीतून कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणाऱ्या नवी मुंबईतील पहिल्या पोलीस ठाण्याची उभारणी झाल्याने ही वास्तू लवकरच आदर्श ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाशी, पनवेल आणि सीबीडी पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ई-संवाद ऑनलाईन सेवा व ‘साय-फाय’ (सायबर व आर्थिक गुन्हे तपास कक्ष) चे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
या इमारतीसाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, सुरक्षिततेसाठी खास लॉकर, तक्रारदार व भेट देणाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था, कर्मचारी विश्रांतीगृह, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष, सुसज्ज लॉकअप रूम, कोठड्या, पार्किंगसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ४० हून अधिक खोल्यांच्या या ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने व अत्याधुनिक सायबर विभाग उभारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटनावेळी संपूर्ण इमारतीची पाहणी करताना १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. या इमारतीमुळे सानपाडा पोलीस ठाण्याचे कामकाज सुकर होणार असून नागरिकांनाही अधिक वेगवान सेवा मिळेल, असे आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.
सानपाडा पामबीच येथील मोराज सर्कलजवळ उभारलेली ही नूतन वास्तू नवी मुंबईच्या शान वाढवणारी ठरणार आहे.