
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी NEET परीक्षेत तब्बल 99.99 टक्के गुण मिळवलेला तरुण मृत्यूला कवटाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्याचं नाव अनुराग अनिल बोरकर (वय 19, रा. नवरगाव, चंद्रपूर) असं आहे.
अनुरागने या वर्षीची NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन देशभरात ओबीसी प्रवर्गात 1475 वा क्रमांक मिळवला होता. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्याला एमबीबीएस प्रवेशही मिळाला होता. उज्ज्वल भवितव्य समोर असूनही त्याने स्वतःचा जीव देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
डॉक्टर व्हायचं नाही’, सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख
अनुरागने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्यांच्या नजरेस पडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने थेट लिहून ठेवलं आहे, “मला डॉक्टर व्हायचं नाही.
ही बाब समोर आल्यानंतर या टोकाच्या निर्णयामागचं खरं कारण उघड झालं आहे.
परदेशी शिक्षणाची इच्छा अपूर्णच राहिली
अनुरागच्या काही जिवलग मित्रांना परदेशात वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाली होती. मात्र अनुरागला भारतातील सरकारी वैद्यकीय संस्थेत प्रवेश घेण्यास सांगण्यात आलं. त्याची इच्छा मात्र परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची होती. ही खंतच त्याच्या मनावर दाटून राहिली आणि शेवटी त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
समाजमन हेलावलं
अनुरागच्या मृत्यूने चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विद्यार्थी,पालक वर्तुळातही वेदना व्यक्त होत आहेत. अशा प्रतिभावान तरुणाने फक्त एका निर्णयामुळे आयुष्य संपवणं ही शोकांतिका आहे, अशी भावना शिक्षक, नातेवाईक व परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलीस पुढील तपास करत असून, या घटनेने पुन्हा एकदा करिअरच्या निवडीबाबतच्या दडपणाकडे गंभीरतेने पाहण्याची वेळ आली आहे.