
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने २ हजार २१५ कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानीसाठी ही मदत देण्यात येणार असून ३१.६४ लाख शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. दिवाळीपूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती मदतीचा लाभ पोहोचेल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संबंधित मंत्री उपस्थित होते.
राज्यातील ३० जिल्ह्यांतील १९५ तालुके, ६५४ महसूल मंडळांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार २७ लाख ९८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नाशिक, नांदेड, यवतमाळसह १५ जिल्ह्यांत दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे.
किती आणि कशी मदत?
• कोरडवाहू पिके : प्रति हेक्टर १८,५०० रुपये
• बागायती पिके : प्रति हेक्टर १७,००० रुपये
• बहुवार्षिक पिके : प्रति हेक्टर २२,५०० रुपये
• खरडून गेलेली जमीन (दुरुस्ती होणारी) : १८,००० रुपये प्रति हेक्टर
• खरडून गेलेली जमीन (दुरुस्ती न होणारी) : ५,००० ते ४७,००० रुपये प्रति हेक्टर
• रेशीम उद्योग नुकसान : एटी/मलबेरी/टसर – ६,००० रुपये, मुगा – ७,५०० रुपये
• जनावरांचे नुकसान : दुधाळ जनावर – ३७,५०० रुपये, ओढ काम करणारे जनावर – ३२,००० रुपये, लहान जनावर – २०,००० रुपये, शेळी/मेंढी/डुक्कर – ४,००० रुपये
• कुक्कुटपालन : प्रति कोंबडी १०० रुपये, प्रति कुटुंब मर्यादा १०,००० रुपये
• घरांची पडझड : झोपडी – ८,००० रुपये, पक्के घर – १.२० लाख रुपये
• गोठा : ३,००० रुपये
मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार असून मोठ्या व छोट्या जनावरांसाठी अनुक्रमे तीन व तीस इतकी मर्यादा ठेवण्यात आली आहे.
कृषीमंत्री भरणे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती दिली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.