
मुंबई प्रतिनिधी
राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना आज, 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे धोक्याचे ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. बीड आणि सोलापूरमध्येही ढगफुटीसदृश्य पावसामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू केले आहे. आपत्कालीन पथके सज्ज असून, जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह ठरत असून, या आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी हा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे.