
उमेश गायगवळे, मुंबई
भारतात क्रिकेट हा खेळ नाही, तर एक वेड आहे. प्रत्येक धाव, प्रत्येक षटकार, प्रत्येक विकेट देशाच्या हृदयाची धडधड वाढवते. विशेषतः भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा प्रश्न आला की ही धडधड दुप्पट होते. कारण हा सामना केवळ २२ यार्डांवर खेळला जात नाही; तो दोन्ही देशांच्या इतिहासाच्या, भावनांच्या, राजकीय वास्तवाच्या, आणि जखमांच्या छायेखाली खेळला जातो.
कालचा आशिया कप सामना यातून वेगळा नव्हता. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, हर्षोल्हासाचा विषय ठरला. पण सामन्यानंतरच्या चर्चा केवळ क्रिकेटपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. सोशल मीडियावर, घराघरांत, कार्यालयांत आणि चौकाचौकांत एकच प्रश्न घुमत राहिला,आपल्याला हा सामना खेळायलाच हवा होता का?
हात न मिळवून मोठं काय साधलं?
टॉसच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद करून ‘हँडशेक’ टाळला. सोशल मीडियावर यावरून “देशप्रेम” ठसवणारे पोस्ट्स, व्हिडिओ, रील्सचा पूर आला. काहींनी तर हे ‘खरे शौर्य’ ठरवले.
पण खरी गोष्ट अशी आहे की हात न मिळवून काही फार मोठं साध्य झालेलं नाही. ही भूमिका योग्य असली तरी ती केवळ प्रतीकात्मक होती. पाकिस्तानसोबत न खेळणं, हाच खरा ठोस संदेश ठरला असता. सामना खेळलाच नसता, तर तो त्यांच्यासाठी पराभवापेक्षाही मोठा धक्का ठरला असता.
अजूनही न भरलेल्या जखमा
चार महिन्यांपूर्वीचा पहलगाम हल्ला आठवा. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराधांची निर्दयी हत्या केली. काही कुटुंबांनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना, पतींना गमावलं. अजूनही ती रक्ताने भिजलेली जमीन भारतीय मनात ताजी आहे. अशा वेळी पाकिस्तानविरुद्ध खेळणं अनेकांना खटकणारं, मनाला चटका देणारं ठरलं.
या पार्श्वभूमीवर “भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होतं” अशी जनभावना होती. ही भावना केवळ रागाची नव्हे, तर अपमान, दुःख आणि स्वाभिमानाची होती.
क्रिकेट की व्यवसाय?
भारत-पाकिस्तान सामना हा जगातील सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या घटनांपैकी एक आहे. हजारो कोटींच्या जाहिराती, प्रायोजकांचे अब्जावधींचे करार, प्रसारण हक्क यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे बीसीसीआयने “बहुदेशीय स्पर्धेत खेळायचं” ठरवलं.
पण याच वेळी प्रश्न उभा राहतो,पैसा महत्त्वाचा की स्वाभिमान? समुद्रातून एक लोटा पाणी काढलं, तर समुद्र सुकतो का? नाही. त्याचप्रमाणे भारताने एका आशिया कपला बहिष्कार दिला असता, तर बीसीसीआयचं काही बिघडलं नसतं. उलट जगभरात एक ठाम संदेश गेला असता,भारत दहशतवाद प्रायोजक देशाशी मैदानावरसुद्धा नातं ठेवणार नाही.
आदेश बोर्डाचा, चेहरा खेळाडूंचा
या संपूर्ण वादात खेळाडूंची चूक नाही. सूर्यकुमार यादव किंवा त्याचे सहकारी हे बीसीसीआयच्या आदेशाखाली खेळले. त्यांना नकार देता आला नसता. पण मैदानावर दिसणारा चेहरा खेळाडूंचाच असल्याने टीकेची झळ त्यांनाच बसते आहे. सोशल मीडियावरील स्तुतीसोबतच टीका त्यांच्यावर होतेय. खरी जबाबदारी घ्यायची असेल, तर ती बोर्डाने आणि सरकारने घ्यायला हवी होती.
खरी धाडस कुठे आहे?
खरे धाडस म्हणजे सामन्यानंतर हात न मिळवणं नव्हे.
खरे धाडस म्हणजे सामना खेळायलाच नकार देणं.
खरे धाडस म्हणजे पैशावर मात करून स्वाभिमानाला प्राधान्य देणं.
जर भारताने या आशिया कपलाच बहिष्कार घातला असता, तर पाकिस्तानसाठी तो पराभवापेक्षा कितीतरी मोठा आघात ठरला असता. कारण मैदानावरचा पराभव त्यांना विसरता आला असता; पण मैदानावर खेळायलाच कुणी तयार नाही, ही लाज ते कधी विसरले नसते.
कालचा विजय गोड आहे. प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीचा छाताड अभिमानाने भरून येतोय. पण या गोडीतही एक कडवट प्रश्न दडलेलाच आहे, आपण खेळायलाच नको होतं का?
पाकिस्तानशी हस्तांदोलन न करणं हा छोटासा प्रतीकात्मक संदेश होता. पण तो खरा मार्ग नाही. खरा मार्ग म्हणजे दहशतवादाचा पाठीराखा असलेल्या देशाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. मैदानावरचा खेळ हे अपवाद असू नयेत.
भारताकडे ताकद आहे, पैसाही आहे, जगात वर्चस्वही आहे. मग काय अडथळा होता? एका आशिया कपमधून मागे हटणं हे भारताच्या क्रिकेटसाठी नुकसानकारक ठरलं नसतं; उलट स्वाभिमानाचा ठसा उमटवणारी घटना ठरली असती.
आणि म्हणूनच आजही तोच प्रश्न मनात खोलवर घुमतो..
पाकिस्तानशी हात न मिळवणं ही फार मोठी गोष्ट नाही; खरी गोष्ट म्हणजे सामना खेळायलाच नको होता.