
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून गुंतवणूक आणि उद्योगांसाठी सर्वोत्तम वातावरण येथे उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. “इज ऑफ डुइंग बिझनेस”मध्ये सातत्याने सुधारणा करून राज्य गुंतवणूकदारांना आकर्षित करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे झालेल्या इंडिया-ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीट या राऊंड टेबल परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत असून… pic.twitter.com/1CeLbFMJAj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 11, 2025
फडणवीस म्हणाले, “गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन नेहमीच तत्पर आहे. १४ क्षेत्रांसाठी नवी धोरणे लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यामध्ये सेवा क्षेत्राचा विशेष समावेश असेल. या क्षेत्राचा राज्याच्या आर्थिक प्रगतीत मोठा वाटा आहे. उद्योजकांना सर्व परवानग्या जलद मिळाव्यात यासाठी मैत्री पोर्टल ही ‘वन स्टॉप’ सुविधा सुरू केली आहे.”
राज्यातील पायाभूत सुविधांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यभर एक्स्प्रेसवेचे जाळे उभारले जात आहे. वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र सागरी व्यापार क्षेत्रात महत्त्वाचा भागीदार ठरणार असून, राज्यातील सर्व प्रमुख केंद्रे सहा तासांच्या अंतरावर या बंदराशी जोडली जाणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांत गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. “या संधींचा ऑस्ट्रेलियन उद्योगांनी जरूर लाभ घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यातील नव्या विमानतळामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तर जलद वाहतुकीसाठीही नवे प्रकल्प हाती घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा या क्षेत्रातील अग्रगण्य देश आहे. अनेक भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात; मात्र आता नवी मुंबईतील एज्यु सिटीमध्ये हेच शिक्षण उपलब्ध होणार आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि कुर्निल विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारामुळे खाणकाम व लोहउद्योग क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाधारित शिक्षण गडचिरोलीत मिळेल. “गडचिरोली ही देशाची ‘लोह राजधानी’ ठरणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या परिषदेस मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे हाय कमिशनर फिलिप ग्रीन, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगण तसेच विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.