
नाशिक, प्रतिनिधी
नाशिक-पेठ महामार्गावरील सावळा घाट परिसरात चालत्या वाहनांवर चढून माल लुटणाऱ्या सराईत टोळीला दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केले. तब्बल आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
सावळा घाट परिसरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून मालवाहतुकीवर धाड टाकून चोरीचे प्रकार वाढले होते. वाहनांचा वेग घाटामुळे कमी होताच टोळीतील काही जण मालवाहू गाड्यांवर चढत. ताडपत्री कापून सामान खाली फेकले जाई आणि इतर साथीदार ते जंगलात गोळा करत पळ काढत. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारात साबणाचे पाच खोके चोरीला गेले होते.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली. सुरगाणा तालुक्यातील रवींद्र दळवी, माधव शेखरे, लालु पवार, गणेश कडाळे, आनंदा पवार यांच्यासह दिनेश गवारे (करंजाळी), चेतन चारोस्कर (निफाड) आणि संजय बेंडकोळी (लखमापूर) अशी आठ जणांची नावे समोर आली. हे सर्व जण दिवसभर शेतमजुरी करत आणि रात्री टोळी करून महामार्गावर लूटमारी करत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
सावळा घाटात गुप्तपाळतीनंतर पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.