
विशेष प्रतिनिधी
दहा दिवसांचा जल्लोषमय उत्सव संपत असताना अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी यंदा शहरात ७० नैसर्गिक स्थळांबरोबरच तब्बल २९० कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सार्वजनिक तसेच घरगुती श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून नियोजनबद्ध पूर्वतयारी करण्यात आली आहे. या संपूर्ण यंत्रणेवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी व गणेशोत्सव समन्वयक उप आयुक्त प्रशांत सपकाळे हे थेट देखरेख करीत आहेत.
विसर्जन काळात शहरभरात तब्बल १० हजार अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार असून २४५ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच निर्माल्य कलश, निरीक्षण मनोरे, प्रकाशव्यवस्था, रुग्णवाहिका आदी सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भाविकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संवर्धन लक्षात घेता, यंदा विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महापालिकेने नागरिक व मंडळांना केले आहे.
सुरक्षा व सुविधा व्यवस्थापन
*चौपाट्यांवर वाहने अडकू नयेत म्हणून १,१७५ स्टील प्लेट
* छोट्या मूर्ती विसर्जनासाठी – ६६ जर्मन तराफे
* २,१७८ जीवरक्षक, ५६ मोटरबोटी तैनात
* ५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ निर्माल्य वाहने
नियंत्रण आणि समन्वय
* विभागीय समन्वयासाठी – २४५ नियंत्रण कक्ष
* सुरक्षा देखरेखीसाठी – १२९ निरीक्षण मनोरे
* विसर्जन स्थळी – ४२ क्रेन, २८७ स्वागत कक्ष
आरोग्य व प्रकाश व्यवस्था
* २३६ प्रथमोपचार केंद्र व ११५ रुग्णवाहिका.
* रात्रीच्या विसर्जनासाठी – ६,१८८ फ्लडलाईट्स व १३८ सर्चलाईट्स
* १९७ तात्पुरती शौचालयं उपलब्ध
* आपत्कालीन तयारीसाठी – अग्निशमन दलाचे वाहन व कर्मचारी
कृत्रिम तलावांची माहिती
* २९० कृत्रिम तलावांची यादी www.mcgm.gov.in संकेतस्थळावर. यामध्ये गुगल मॅप लिंकसह उपलब्ध.
* QR कोड स्कॅन किंवा BMC WhatsApp Chatbot: ८९९९२२८९९९ वरून माहिती. (Ganesh Visarjan)
नागरिकांना सूचना व आवाहन
* विसर्जनस्थळी पावित्र्य व शिस्त राखावी.
* बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांच्या सूचना पाळाव्यात.
* गर्दीत सतर्क राहावे, जबाबदारीने वागावे.
मत्स्यदंश व सागरी सुरक्षितता
* ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे. यापासून सावध रहावे.
* मत्स्यदंश झाल्यास वैद्यकीय कक्ष व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध.
भरती-ओहोटी :
६ सप्टेंबर :
* सकाळी ११.०९ – ४.२० मीटर भरती
* सायंकाळी ५.१३ – १.४१ मीटर ओहोटी
* रात्री ११.१७ – ३.८७ मीटर भरती
७ सप्टेंबर :
* पहाटे ५.०६ – ०.६९ मीटर ओहोटी
* सकाळी ११.४० – ४.४२ मीटर भरती
भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना
* समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नका.
* प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
* काळोखाच्या जागी व निषिद्ध क्षेत्रात विसर्जन टाळा.
* बुडणारी व्यक्ती दिसल्यास तात्काळ सूचना द्या.
* अफवा पसरवू नका, विश्वासही ठेवू नका.
* लहान मुलांची विशेष काळजी घ्या.