मुंबई प्रतिनिधी
मुंबईत ८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार असून घाटकोपर आणि मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेकडो गाड्या, दुचाकी आणि ट्रक या मिरवणुकांमध्ये सहभागी होणार असल्याने वाहतुकीवर मोठा ताण पडणार आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना यावेळी कुर्ला ते विक्रोळी दरम्यानच्या एलबीएस मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पार्किंगवर निर्बंध
• अवजड वाहनांसाठी छेडानगर जंक्शन ते मानखुर्द टी-जंक्शन हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. (ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीतील वाहनं आणि बेस्ट बसेस यांना अपवाद)
• हलक्या वाहनांसाठी घाटकोपर–मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुल वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
• घाटकोपर–मानखुर्द लिंक रोडवर (छेडानगर ते मानखुर्द टी-जंक्शन) वाहन पार्किंगला सक्त मनाई असेल.
पर्यायी मार्ग
• छेडानगरहून वाशीला जाणाऱ्या वाहनांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, उमरशी बाप्पा जंक्शन आणि व्ही. एन. पुरव मार्गाचा पर्याय वापरावा.
• मानखुर्द टी-जंक्शनवरून घाटकोपर वा विक्रोळीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उमरशी बाप्पा जंक्शन व व्ही. एन. पुरव मार्ग उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
मिरवणुकीचा मार्ग
घाटकोपर (पश्चिम) येथील चिराग नगर लेनमधील जामा मशिदीतून दुपारी १ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. विक्रोळीतील पार्कसाइट येथे ही मिरवणूक समाप्त होईल. या मिरवणुकीत सुमारे २५ हजार नागरिक आणि १०० वाहनांचा सहभाग अपेक्षित असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रभावित होणारे मार्ग
एलबीएस मार्ग (चिराग नगर, घाटकोपर ते गुलाटी पेट्रोल पंप, विक्रोळी)
प्रीमियर जंक्शन ते गांधी नगर जंक्शन (पवई) : या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश नसेल. खासगी, एसटी व बेस्ट बसेसलाही या कालावधीत परवानगी दिली जाणार नाही.
वाहन वळवण्याची व्यवस्था
• पवई गांधी नगर जंक्शनहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना जेव्हीएलआर मार्गे विक्रोळीमार्गे वळवले जाईल.
• श्रेयस जंक्शन आणि सावित्रीबाई फुले जंक्शनकडे जाणारी वाहनं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे व पंतनगरकडे वळवण्यात येतील.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना या बदलांचा विचार करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.


