
मुंबई प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांना प्रकृतीच्या तक्रारीमुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणार असून ती उद्या पार पडण्याची माहिती समोर आली आहे. मात्र नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत तपशील जाहीर झालेला नाही.
राजकारणातील ‘आक्रमक’ शैलीसाठी ओळखले जाणारे राणे हे काही काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात करून त्यांनी काँग्रेसमार्गे भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सध्या ते लोकसभेचे सदस्य आहेत. राणे यांचे पुत्र नितेश राणे हे राज्य सरकारमध्ये मंत्री असून दुसरे पुत्र निलेश राणे हेही सक्रिय राजकारणात आहेत.
उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक म्हणूनही राणे यांची ख्याती आहे. त्यांची भाषाशैली आणि बिनधास्त टीका नेहमीच चर्चेत असते. सध्या मात्र त्यांची प्रकृती चिंतेत टाकणारी ठरली असून रुग्णालयीन उपचारांनंतर त्यांच्या शस्त्रक्रियेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.