
मुंबई प्रतिनिधी
आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो आंदोलकांनी गेल्या आठवड्यात मुंबईकडे मोर्चा वळवला. आंदोलकांसोबत तब्बल साडेदहा हजार गाडय़ा शहरात दाखल झाल्या. दक्षिण मुंबईसारख्या संवेदनशील व अरुंद रस्त्यांच्या भागात इतकी प्रचंड गर्दी एकवटल्याने वाहतूक ठप्प होण्याची शक्यता अधिक होती. मात्र वाहतूक पोलिसांनी काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध कारभार आणि सौजन्यशिलतेच्या आधारे ही अवघड परिस्थिती हाताळली. परिणामी मुंबईची गती थांबली नाही.
आधीच आखलेले नियोजन
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी आंदोलकांची व त्यांच्या वाहनांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन पूर्वतयारी केली होती. त्याअंतर्गत शिवडी, रे रोड, वडाळा आणि डॉकयार्ड परिसरात जवळपास साडेपाच हजार वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही उर्वरित पाच हजार वाहने कुलाबा, मरीन ड्राइव्ह परिसरात दाखल झाली. त्यासोबतच हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले. तरीही वाहतूक कोलमडली नाही.
शिस्तबद्ध कारभार
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी अबेद सय्यद, वरिष्ठ निरीक्षक योगेश चव्हाण, नितीन गायकवाड, नागटिळक, संजय देशमुख, खाडे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मार्गांवर वाहतूक वळविण्याचे नियोजन राबवले. त्यामुळे महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीची गती सुरळीत ठेवणे शक्य झाले. पाच दिवस चाललेल्या आंदोलनाच्या काळातही नागरिकांना वाहतुकीच्या खोळंब्याचा फारसा फटका बसला नाही.
आंदोलकांचे सहकार्य
“वाहतुकीचा खोळंबा होऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही आधीच तयारी केली होती. आंदोलकांनीही शिस्त दाखवत सहकार्य केल्याने परिस्थिती सुरळीत ठेवता आली,” असे सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितले.