
कन्नड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कन्नड तालुक्यात सोमवारी सकाळी औराळा फाट्यावर शेकडो मराठा बांधव एकत्र जमले. भगवे उपरणे व शाली फिरवत घोषणाबाजी करत त्यांनी जरांगे पाटलांच्या लढ्याला ठाम पाठींबा दिला.
मुंबईला प्रत्यक्ष उपस्थित राहता न आलेल्या बांधवांसाठी आंदोलन स्थळावरून आवाहन करण्यात आले होते की, गावोगावी चौकाचौकांत जमून आंदोलनाशी एकात्मता दर्शवावी. या आवाहनाला औराळा, औराळी, विटा, खामगाव, कानडगाव, हिंगणे, सहानगाव, रोहिला, शेरोडी, गव्हाली, चिंचखेडा, बिपखेडा, धनगरवाडी, जवळी, कविटखेडा, हसनखेडा अशा गावांतून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मनोजदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी औराळा फाटा दुमदुमून गेला.
शिदोरीचा ओघ कायम
मुंबईतील आंदोलन स्थळी लाखो बांधवांसाठी कन्नड तालुक्यातील विविध गावांतून शिदोरीचा ओघ सुरूच आहे. विटा गावातून ११ हजार बुंदी व चिवड्याचे पॅकेट, पाच क्विंटल भाकरी, पाच हजार पाण्याच्या बाटल्या पाठविण्यात आल्या. चिंचखेडा ग्रामस्थांनी तब्बल २० क्विंटल गव्हाच्या गोड पुऱ्या तयार केल्या. तर धामणी, सावरगाव, शेलगाव, रायपूर, बरकतपूर, दहिगावस, कोपरवेल, नाचनवेल, लोहगाव या गावांतून भाकरी, पुरी, ठेचा, लोणचे, चिवडा घेऊन १५-२० बांधव थेट मुंबईकडे रवाना झाले.
दीर्घकाळ टिकणाऱ्या अन्नपदार्थांचे आवाहन
आंदोलन स्थळी पोहोचलेले बांधव सांगतात की, भाकरी-चपातीसारखे पदार्थ काही तासांत खराब होतात. त्यामुळे गावाकडून पाठवले जाणारे अन्नपदार्थ किमान चार-पाच दिवस टिकणारे असावेत, असे आवाहन त्यांनी बांधवांना केले आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याने आता गावोगावचा रंग घेतला असून, एकच घोषणाबाजी सुरू आहे, “लढेंगे, जीतेंगे!”