
बंगळुरू प्रतिनिधी
बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला तब्बल ८४ दिवस उलटले असताना अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पीडितांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ‘RCB Cares’ या उपक्रमांतर्गत संघाने प्राण गमावलेल्या ११ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले.
जून २०२५ मध्ये इंडियन प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंगळुरूमध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यावेळी स्टेडियमबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली. या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला, तर ५६ जण जखमी झाले. या घटनेनंतर संघ, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती.
RCB ने यापूर्वी माफी मागून जखमींची काळजी घेतली जाईल असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर जवळपास तीन महिने संघाने मौन बाळगले. अखेर शनिवारी संघाने भावनिक पत्रक प्रसिद्ध करून आर्थिक मदतीची घोषणा केली.
“आपण RCB कुटुंबातील ११ जणांना गमावले आहे. ते आपल्या शहराचा, कम्युनिटीचा आणि संघाचा अविभाज्य भाग होते. त्यांची अनुपस्थिती सदैव जाणवेल. कोणतीही किंमत त्यांच्या पोकळीला भरून काढू शकत नाही. पण त्यांच्या कुटुंबियांना सन्मानपूर्वक २५ लाख रुपयांची मदत आम्ही देत आहोत. ही फक्त आर्थिक मदत नसून करुणा, ऐक्य आणि काळजीचे आश्वासन आहे,” असे संघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेवरील तपास अहवालात कर्नाटक सरकारने RCB संघ, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारी DNA Network Pvt. Ltd. यांना दोषी ठरवले आहे. तसेच, न्यायमूर्ती जॉन मायकेल डी’कुन्हा आयोगाने एम. चिन्नास्वामी स्टेडियम असुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. यानंतर महिला विश्वचषकातील सामने या मैदानावरून हलवण्यात आले आहेत.