
मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. काल शिवनेरीवर मुक्कामी असलेला हा मोर्चा आज सकाळी शिवजन्म स्थळाचे दर्शन घेऊन जुन्नरमध्ये होणाऱ्या प्रमुख सभेनंतर पुढे सरकणार आहे.
जुन्नरमधील कार्यक्रमानंतर आंदोलक दुपारनंतर मुंबईकडे कूच करतील. चाकण, तळेगाव, लोणावळा या महत्त्वाच्या ठिकाणांवरून मार्गक्रमण करत हा ताफा वाशीमार्गे थेट मुंबईत प्रवेश करणार आहे. पुणे-नाशिक महामार्गासह विविध ठिकाणी आंदोलकांचे स्वागत करण्यासाठी मराठा समाज मोठ्या संख्येने उभा आहे.
29 ऑगस्ट रोजी सकाळी जरांगे-पाटील आझाद मैदानात दाखल होणार असून येथे सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली जाईल. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आंदोलनाला परवानगी देण्यात आली असली तरी, फक्त 5 हजार लोकांच्या उपस्थितीची अट असल्याने जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लाखोंच्या संख्येने लोक आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
मोर्चाचा दुसरा दिवस असल्याने आजच्या प्रवासात मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरणार असून, यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण येईल, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.