सातारा प्रतिनिधी
जिल्ह्यातील धोकादायक शाळांची दुरुस्ती लवकरच होणार आहे. शासनाने यासाठी तब्बल ६७ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर केला असून, त्यातून १९ शाळांची इमारती नव्याने उभारल्या जाणार आहेत.
दुर्गम व डोंगराळ भागात अनेक शाळा वर्षानुवर्षे पडझडीच्या स्थितीत उभ्या आहेत. काही ठिकाणी पावसाळ्यात छप्पर गळणे, भिंतींना भेगा पडणे, पत्रा गंजणे, खिडक्यांची दुरवस्था अशा अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः धोक्यात चालले आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिकावे लागत असल्याची परिस्थिती पालक आणि स्थानिकांनी वारंवार मांडली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक शाळांचा सर्वे करण्यात आला. त्यानंतर शासनाने निधी मंजूर केला असून, हे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिले आहेत. तसेच दुरुस्तीची कामे दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
या शाळांची होणार दुरुस्ती
* जिल्हा परिषद शाळा खंडाळा, शिंदेवाडी, शिरवळ (ता. खंडाळा)
* दरुज, पडळ (ता. खटाव)
* ल्हासुर्णे, एकंबे (ता. कोरेगाव)
* बरड, हिंगणगाव, चौधरवाडी (ता. फलटण)
* बोपर्डी (ता. वाई)
* मेटगुताड, राजापुरी (ता. महाबळेश्वर)
* अपशिंगे, कोडोली (ता. सातारा)
* कोडोली (ता. कऱ्हाड)
* ढेबेवाडी (ता. पाटण)
* आंधळी, राजवडी (ता. माण)


