सातारा प्रतिनिधी
सातारा : शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेत एकूण ४ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. यात सोन्याचे दागिने व १ लाख ९४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमचा समावेश आहे.
दि. ४ ऑगस्ट रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार गु.र.नं. २१७/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी विशेष तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून, फिर्यादीकडून माहिती घेतली. परिसरातील २० ते २५ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका संशयिताचा माग काढण्यात आला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर कौशल्यपूर्ण तपासात त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
सदर आरोपी विशाल अजित आटोळे (२६, रा. गोगावलेवाडी, ता. सातारा) याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४.५८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक ढेरे व अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी सहभाग नोंदवला.


