
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | दादर स्टेशनजवळील दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश अखिलेश श्रीवास्तव (32, रा. टिटवाळा) यास दीड वर्षाच्या फरारीनंतर माटुंगा पोलिसांनी गजाआड केले आहे. फरारी काळात त्याने दाढी वाढवून गेटअप बदलला होता व उत्तर भारतातील विविध ठिकाणी लपून राहत पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा लावून अटक केली.
१७ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री बलराम कुमार सिंग व त्यांचे सहकारी दादर स्टेशनहून लोअर परळकडे टॅक्सीने जात असताना रामी हॉटेलसमोरच्या रस्त्यावर अनोळखी इसमांनी टॅक्सी अडवून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी आरोपींनी लाल रंगाची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली होती. त्या बॅगेत सुमारे २७ लाख रुपये किमतीचे ३५ किलो कास्टिंग गोल्ड व गोल्ड फायलिंग डस्ट होते. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात दरोडा, मारहाण आणि कटकारस्थानाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
घटनेनंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून २ लाख रुपये रोख, १२६.२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ किलो १०० ग्रॅम कास्टिंग गोल्ड व गोल्ड डस्ट यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र मुख्य आरोपी श्रीवास्तव फरार राहिला होता.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन्द्र भारती, सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर आयुक्त विक्रम देशमाने, उपायुक्त रागसुधा आर. व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक केशव वाघ, उपनिरीक्षक संतोष माळी, तसेच कर्मचारी देवेंद्र बहादुरे, प्रवीण तोडासे आणि किशोर देशमाने यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.