
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्रेमसंबंधातून खळबळजनक खूनाची घटना उघड झाली आहे. छावा संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याने आपल्या प्रियकराचा मामेभावाच्या मदतीने गळा चिरून खून केला. त्यानंतर मृतदेह गोदावरी नदीत फेकण्यात आला.
३१ जुलैपासून बेपत्ता असलेला सचिन पुंडलिक औताडे (३२, रा. हर्सूल) याचा मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील मुंगी येथे १३ ऑगस्ट रोजी गोदावरी नदीकाठी आढळला. मृतदेहाची ओळख पटताच या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि अवघ्या चार दिवसांत दोन आरोपींना अटक करण्यात आली. अफरोज खान हा तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये भारती रवींद्र दुबे (रा. कॅनॉट प्लेस, सिडको) व तिचा मामेभाऊ दुर्गेश तिवारी (रा. खुलताबाद) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भारती दुबे ही छावा संघटनेची पदाधिकारी असून सचिन औताडेही त्याच संघटनेत कार्यरत होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र सचिन विवाहित असल्याने त्याने लग्नाला नकार दिला. यावरून भारतीने कट रचला.
३१ जुलैला सचिन व भारती कॅनॉट येथील फ्लॅटवर थांबले होते. दारूच्या पार्टीदरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी भारतीने मामेभाऊ दुर्गेशला बोलावून घेतले. दुर्गेशने चाकूने सचिनचा गळा चिरून खून केला. नंतर मृतदेह पैठणला गोदावरी नदीत फेकण्यात आला.
मृतदेह सापडल्यावर सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृताच्या हातावर कोरलेले नाव आणि नोंदवलेली बेपत्ता तक्रार यामुळे प्रकरण उघड झाले. शेवटी चौकशीत भारती दुबे व तिच्या साथीदारांचा खूनातील सहभाग उघडकीस आला.