
जळगाव प्रतिनिधी
शेतमालाचे रक्षण करण्यासाठी उभारलेल्या बेकायदा विद्युत कुंपणाने अक्षरशः पाच जणांचे आयुष्य हिरावून घेतले. एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावाजवळ घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत मध्य प्रदेशातील मजूर कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. या संपूर्ण दुर्घटनेतून दोन वर्षांची दुर्गा ही चिमुरडी चमत्कारिकरित्या बचावली. मात्र ती आई–वडील, दोन भावंडे आणि आजीच्या मृतदेहाजवळ बसून रडत असल्याचे दृश्य पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले.
मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (३५), पत्नी सुमन (३०), मुलगे पवन (४), कवल (३) आणि विकास यांची सासू लीलाबाई जमसिंग पावरा (६०) यांचा समावेश आहे. हे सर्वजण बऱ्हाणपूर जिल्ह्यातील ओसरानी गावचे रहिवासी असून मजुरीसाठी वरखेडी परिसरात आले होते.
दुर्गेचा आक्रोश
मंगळवारी मध्यरात्री पावरा कुटुंब पायवाटेने शेतातून जात असताना त्यांच्या नकळत विद्युत कुंपणाला स्पर्श झाला आणि पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एका शेतकऱ्याला दोन वर्षांची दुर्गा मृतदेहांजवळ रडताना दिसली. लगेचच पोलिसांना कळवण्यात आले.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दुर्गा आई-वडील व भावंडांच्या प्रेताजवळ बसलेली होती. महिला पोलीस कर्मचारी मधुरा पवार यांनी तिला जवळ घेताच घटनास्थळी उपस्थित अनेकांचा कंठ दाटून आला.
बेकायदा विद्युत कुंपणाचा बळी
शेतमालक बंडू यु. पाटील यांनी रानडुक्करांपासून मका पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताला विद्युत प्रवाह सोडलेले तारेचे कुंपण लावले होते. या बेकायदा कुंपणामुळे आधी दोन रानडुक्करांचा मृत्यू झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तारे, वायर जप्त करून पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
दुर्गेच्या नातेवाइकांचा शोध
सध्या दुर्गा हिची तात्पुरती जबाबदारी पोलिसांनी स्वीकारली आहे. तिच्या जवळच्या नातेवाइकांचा शोध सुरू असून समाजकल्याण विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.
या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतमाल वाचविण्याच्या आटापिटीत शेतकऱ्यांनी उभारलेले बेकायदा विद्युत कुंपण अख्ख्या कुटुंबासाठी मृत्यूचे कुंपण ठरले, हेच वास्तव या घटनेतून उघड झाले आहे.