
नवी दिल्ली वृत्तसंस्था
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित केला असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी.पी. राधाकृष्णन यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
एनडीएच्या संसदीय मंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री आदींच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर राधाकृष्णन यांच्या नावावर एकमत झाले.
#WATCH | Delhi: Maharashtra Governor CP Radhakrishnan will be the NDA's candidate for the Vice Presidential election, says BJP national president and Union Minister JP Nadda pic.twitter.com/VzSJVjoF6p
— ANI (@ANI) August 17, 2025
दक्षिणेकडील समीकरणांचा विचार
राधाकृष्णन यांची निवड ही केवळ व्यक्तिनिष्ठ नसून भाजपच्या धोरणात्मक रणनीतीचाही एक भाग मानली जात आहे. दक्षिण भारतात आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नांत असलेल्या भाजपने तामिळनाडूमधील नेतृत्वाला उपराष्ट्रपतीपदासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर संधी दिल्याने पक्षाला दीर्घकालीन राजकीय लाभ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजकीय अनुभव महत्त्वाचा
कोयंबतूर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेल्या राधाकृष्णन यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. पक्षनिष्ठा, प्रशासकीय अनुभव आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला विश्वास यामुळे त्यांची उमेदवारी सहज निश्चित झाल्याचे पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.
निवडणूक जवळपास निश्चित
उपराष्ट्रपतीची निवडणूक लोकसभा व राज्यसभेतील खासदारांमार्फत होत असली, तरी सध्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीएचे संख्याबळ भक्कम असल्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. विरोधी इंडिया आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.
निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान
एनडीएचा हा निर्णय दक्षिणेकडील राज्यांबाबतची वाढती तळमळ आणि जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान देण्याची परंपरा अधोरेखित करणारा असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. पुढील काही दिवसांत राधाकृष्णन यांच्या उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.