
वृत्तसंस्था
आशिया कप २०२५साठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या बहुप्रतिक्षित स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर शुभमन गिलला उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने १५ सदस्यीय भारतीय संघ निश्चित केला. यावेळी कसोटी संघाचा कर्णधार असलेला शुभमन गिल मर्यादित षटकांच्या संघात उपकर्णधार म्हणून उतरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला यावेळी स्थान देण्यात आलेले नाही.
पाकिस्तानविरुद्धचा ऐतिहासिक सामना भारतीय संघ १४ सप्टेंबर रोजी खेळणार आहे. याआधी १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध पहिला सामना होणार असून, १९ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्धचा गट-सामना खेळला जाणार आहे. आशिया कपचे यजमानपद भारताकडे असले तरी सर्व सामने यूएईत खेळवले जाणार आहेत.
निवड समितीने स्पर्धेसाठी पाच खेळाडूंना स्टँडबायमध्ये ठेवले आहे. यात प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियाग पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वालचा समावेश आहे.
भारतीय संघ – आशिया कप २०२५
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंग.