
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील किणी गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बसमधून प्रवास करताना वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला एक अल्पवयीन मुलगा बसमधून ये-जा करताना सातत्याने त्रास देत होता. हा प्रकार तिने आपल्या आईपाशी उघड केला होता. यानंतर आईनं पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आई घरात नसताना सततच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणीनं आपलं जीवन संपवलं.
या प्रकरणी पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील बालसुधारगृहात दाखल केले आहे. एकतर्फी प्रेमातून हा छळ सुरू असल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर किणी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून पीडितेला श्रद्धांजली वाहिली. “पीडितेला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत” यासाठी कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.