
कोल्हापूर प्रतिनिधी
चार दशकांहून अधिक काळ चालत आलेली कोल्हापूरकरांची प्रतीक्षा अखेर रविवारी संपली. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून या ऐतिहासिक क्षणाची नोंद न्यायदानाच्या इतिहासात झाली.
या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह न्यायमूर्ती, मान्यवर व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला पोलीस दलाने गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर मान्यवरांनी नव्या इमारतीची पाहणी केली व बांधकामाच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
हेरिटेज इमारतींना नवी झळाळी
सीपीआर रुग्णालयासमोरील सन १८७४ मध्ये बांधलेली जिल्हा न्यायालयाची हेरिटेज इमारत या सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा जिवंत झाली आहे. अल्पावधीत केलेल्या नूतनीकरणामुळे परिसराला नवे रूप लाभले असून न्यायदानाच्या परंपरेला नवीन उभारी मिळाली आहे.
परिसराचा कायापालट
सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ एका महिन्यात इमारतींची डागडुजी व नूतनीकरण पूर्ण केले. यामुळे परिसराचे सौंदर्य खुलून आले असून, हा भाग शहराचा नवा ओळखबिंदू ठरला आहे.
कामकाजाची वेळ
सर्किट बेंचमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते ४.३० या दोन सत्रांत न्यायालयीन कामकाज चालेल.
डिव्हिजन व सिंगल बेंचची व्यवस्था
कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या हेरिटेज इमारतीत डिव्हिजन बेंच तर नव्या आरसीसी इमारतीत दोन सिंगल बेंच कार्यरत असतील. रजिस्ट्रार कक्ष, रेकॉर्ड रूम, मध्यस्थी केंद्र, सरकारी वकिलांची कार्यालये यांची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ऐतिहासिक राधाबाई बिल्डिंगलाही नवे रूप मिळाले असून त्यात रजिस्ट्रारचे कार्यालय व न्यायाधीशांसाठी लॉन्जची व्यवस्था आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला दिलासा
या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी मुंबई गाठण्याची आवश्यकता राहणार नाही. वेळ, पैसा व श्रमांची बचत होऊन नागरिकांना सुलभ न्याय उपलब्ध होईल. यामुळे उद्योग, शिक्षण, व्यापार व कायद्याच्या अभ्यासकांसाठी नवनवीन संधी खुल्या होतील.
न्यायलाभाच्या या नव्या पर्वामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या न्यायप्राप्तीच्या प्रवासाला ऐतिहासिक गती मिळणार आहे.