
कोल्हापूर प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकून, कोयत्याचे सपासप वार करत तिचा खून केला. या घटनेमुळे दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून आईचे सावली कायमची हरपली आहे.
प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मिस्त्री (रा. भादोले) असे आरोपीचे नाव असून, रोहिणी प्रशांत पाटील (वय २९, मूळ रा. ढवळी, ता. वाळवा) असे मृत पत्नीचे नाव आहे.
कौटुंबिक वादातून उलगडले हत्याकांड
प्रशांत व रोहिणी पाटील हे दाम्पत्य गेली आठ वर्षे भादोले येथे आपल्या दोन मुलींसह वास्तव्यास होते. प्रशांतचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय असून, घरगुती कारणांमुळे दाम्पत्यामध्ये काही काळापासून वाद सुरू होता. रोहिणीचे वडील आजारी असल्याने ती वारंवार माहेरी जात होती. यावरून पती’पत्नीमध्ये तणाव वाढत गेला.
सोमवारी रात्री रोहिणी माहेरून पतीसोबत गावाकडे परतत असताना, वारणा नदीवरील पुल ओलांडल्यानंतर प्रशांतने दुचाकी थांबवली. अचानक त्याने पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकली आणि जवळच्या कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले. निर्जन स्थळी ही घटना घडल्याने मदतीस कोणीही धावून आले नाही. त्यामुळे रोहिणीचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी अटकेत
हत्या करून आरोपी प्रशांतने मृतदेह घटनास्थळी टाकून दिला. त्यानंतर घरी जाऊन घरच्यांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले आणि पसार झाला. वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी तात्काळ तपास सुरू करून, रात्री उशिराच प्रशांतला अटक केली.
या हत्याकांडामुळे भादोलेसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रोहिणीच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन निष्पाप मुलींच्या डोक्यावरून आई”बापाचे सावली एकाच वेळी हिरावले गेल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर होत आहेत.
हत्या नेमकी कोणत्या कारणातून घडली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे.