
कोल्हापूर : प्रतिनिधी
पीडित महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याच्या आरोपावरून चंदगड पोलिस ठाण्यातील हवालदार सुनील बळीराम कुंभार (वय 47, रा. तळसंदे) याला रविवारी रात्री निलंबित करण्यात आले. ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली.
कुंभार याच्याविरुद्ध शनिवारी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभरापूर्वी पीडिता एका प्रकरणात फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपास कुंभार याच्याकडे होता. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने पीडितेशी सलगी वाढवून तिला ‘आयुष्यभर सांभाळतो’ अशी भलावण केली. त्यानंतर वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
संशयिताने लग्नास नकार देत पीडितेला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस विभागाने तत्काळ कारवाई करत हवालदार कुंभार याला निलंबित केले.