
धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा बुधवारी दुपारी थरारून गेला. करजखेडा चौरस्त्यावर शेतजमिनीच्या जुन्या वैरातून पती-पत्नीचा भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात भीतीची सावली पसरली आहे.
मृतांमध्ये सहदेव भागवत पवार (३२) आणि पत्नी प्रियंका सहदेव पवार (२८, रा. करजखेडा) यांचा समावेश असून, संशयित आरोपी हरिबा यशवंत चव्हाण (५५) आणि मुलगा जीवन चव्हाण (३३, दोघे रा. करजखेडा) असे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सहदेव पवार व हरिबा चव्हाण हे नात्याने आतेभाच्चे. त्यांच्या शेतजमिनी शेजारी असून बांधावरील हक्कावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू होता. चार वर्षांपूर्वी सहदेव पवार यांनी जीवन चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यासाठी त्याला तुरुंगवास झाला व महिनाभरापूर्वीच तो जामिनावर सुटला होता.
सहदेव सुटल्यानंतरच चव्हाण कुटुंबाच्या मनात सूडाची ठिणगी पेटली होती. बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास सहदेव व प्रियंका पवार हे दुचाकीवरून कीटकनाशक आणण्यासाठी करजखेडा चौरस्त्याकडे जात होते. त्याचवेळी, चव्हाण पिता-पुत्रांनी चारचाकी (एमएच-२४-एएफ-४०६५) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. पती-पत्नी रस्त्यावर पडताच, कोयत्याने वार करत जागीच त्यांचा खून केला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, “हा हल्ला इतका अचानक व निर्दयी होता की पाहणाऱ्यांचे अंगावर काटा उभा राहिला.” घटनेनंतर आरोपी पसार झाले. बेंबळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.
या दुहेरी खुनामुळे परिसरात प्रचंड खळबळ, भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.